Ad will apear here
Next
साहित्यसेवेचा गौरव
गेली पन्नास वर्षे मराठी कविता, कथा, कादंबरी, समीक्षा आणि संशोधन करणाऱ्या वसंत आबाजी डहाके यांना महाराष्ट्र फाउंडेशनचा यंदाचा जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला. हा पुरस्कार  म्हणजे त्यांनी व्रतस्थपणे केलेल्या मराठी साहित्याच्या सेवेचा गौरव होय. 
......
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष असलेल्या वसंत आबाजी डहाके यांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातल्या बेलोरे या गावी झाला. घरच्या शेतात राबतानाही त्यांची शिक्षणाची ओढ कायम राहिली. गावच्या शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत मराठी विषयातली एम. ए. पदवी मिळवली. 

एम. ए. च्या पहिल्या वर्षाला असताना एक आगळा पक्षी ही त्यांची कथा प्रतिष्ठित सत्यकथा मासिकात प्रसिद्ध झाली. कथा लेखनाच्या रुळलेल्या वाटा आणि चाकोऱ्या मोडून मानवी भावजीवनाचे गुंतागुंतीचे जीवन त्यांनी प्रभावीपणे शब्दात मांडले होते. पुढे चंद्रपूर, अमरावती आणि आर्वीमधल्या महाविद्यालयात मराठीचे अध्यापन करताना त्यांचे प्राचीन आणि अर्वाचीन मराठी साहित्याचे संशोधन सुरू होते. ग्रामीण आणि शहरी जीवनातल्या मानवी प्रवासाचा भेदकपणे अनुभव घेतलेल्या डहाके यांची मे १९६६ मध्ये योगभ्रष्ट ही प्रदीर्घ कविता प्रसिद्ध झाली.

त्यांच्या कवितेतली प्रतिमासृष्टी ही वेगळी आणि अनोखी असल्यानेच त्यांच्या कवितेला लोकप्रियताही मिळाली. योगभ्रष्ट, शुभवर्तमान हे त्यांचे कवितासंग्रह प्रसिद्ध झाले. आणीबाणीच्या काळातील अत्याचार आणि विचारस्वातंत्र्याच्या गळचेपीमुळे मानवी जीवनात निर्माण झालेल्या असुरक्षिततेच्या भावनांचे समर्थ चित्रण त्यांनी कवितांद्वारे केले. अमानुष सत्तेचे दिवस ही त्यांची कविता विचारस्वातंत्र्याच्या घुसमटीने घायाळ झालेल्या माणसांच्या भावनांची अभिव्यक्ती होय. 

१९७५ मध्ये अधोलोक ही त्यांची पहिली कादंबरी प्रसिद्ध झाली. त्यानंतर प्रतिबद्ध आणि मर्त्य या लघु कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या. समकालीन आणि नवसाहित्याची विवेचक समीक्षाही त्यांनी केली आहे. नवसाहित्योत्तर साहित्याचाही समीक्षेद्वारे मागोवा त्यांनी घेतला आहे. प्राचीन आणि अर्वाचीन साहित्याचे दर्शन घडवणाऱ्या संक्षिप्त मराठी वाङ्मयकोश आणि वाङ्मयीन संज्ञा संकल्पनाकोश या दोन ग्रंथांचे संपादनही त्यांनी केले आहे. या ग्रंथासाठी त्यांनी लिहिलेली मर्मभेदी प्रस्तावना ही मराठी साहित्याच्या अभ्यासक आणि संशोधकांना मार्गदर्शक ठरली आहे. मराठी साहित्य, इतिहास आणि संस्कृतीचे साक्षेपी संशोधन करणाऱ्या डहाके यांना निसर्गाची आणि अधीन संस्कृतीची ओढ आहे. मानवी जीवनातले विविध रंग आणि मानसिक कोंडमारा, श्रम, संकटे यांचे यथार्थ दर्शन त्यांच्या कथा, कविता आणि कादंबऱ्यांत घडते.

यात्रा, आंतरयात्रा या आत्मचिंतनपर ग्रंथात त्यांच्या आवडीच्या विषयांच्या प्रगाढ चिंतनाची प्रचिती येते. मानवी जीवन हे निसर्गाप्रमाणेच प्रवाही आणि सतत बदलणारे आहे. निसर्ग आणि मानवाचे नाते ते आपल्या साहित्याद्वारे यथार्थपणे उलगडून दाखवतात. प्रतिभावंत चित्रकार असलेल्या डहाके यांनी आपल्या कविता आणि साहित्यकृतीसाठी केलेली चित्ररेखाटने ही चाकोरी मोडणारी आणि भेदक आहे.

माणूस हाच त्यांच्या साहित्याचा केंद्रबिंदू राहिला. समीक्षा आणि विविध साहित्य संमेलनात केलेल्या विवेचक भाषणाने मराठी साहित्याचा पट उलगडून दाखवताना नवनिर्मिती आणि प्रतिभेचे नाते, कवितेच्या विविध प्रतिमांचा उलगडाही त्यांनी सोप्या आणि साध्या भाषेत करून दाखवला. नव्या लेखकांना मार्गदर्शन करतानाच अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी प्रोत्साहन देत लिहितेही केले आहे. 

जी. ए. कुलकर्णी यांच्या कथेवर आधारित निघालेल्या कैरी या चित्रपटात त्यांनी अभिनयही केला होता. जीवनाकडे सौंदर्यदृष्टीने पाहणाऱ्या डहाके यांनी केलेले लेखन हे मराठी साहित्याच्या अभ्यासक आणि विद्यार्थ्यांना नवी दिशा दाखवणारे ठरले आहे.

- वासुदेव कुलकर्णी 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/EZBJCH
Similar Posts
अनुराधा पाटील यांच्या कविता म्हणजे स्त्री मनाच्या भावनांचा आविष्कार कवयित्री अनुराधा पाटील यांच्या ‘कदाचित अजूनही’ या कवितासंग्रहाला या वर्षीचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानिमित्त त्यांच्याविषयी माहिती देणारा हा लेख...
दत्ता टोळ प्रसिद्ध बालसाहित्यकार दत्ता टोळ यांचा २१ डिसेंबर हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...
ग्रंथसांगाती बालपणातले.... आष्ट्यात त्या वेळी फार मोठी लायब्ररी नव्हती. एक ग्रंथालय होतं. आता नक्की आठवत नाही. कौलारू इमारत होती. त्या वेळी फारसे तिथे गेलेले आठवत नाही; पण ओळखीच्या दुकानातून पुस्तके वाचायला आणायचो. त्या वेळी लाभलेली पुस्तकांची संगत आजही कायम आहे...
आषाढाच्या पहिल्या दिवशीं... आज आषाढ महिन्याचा पहिला दिवस, अर्थात महाकवी कालिदास दिन. त्या निमित्ताने, ‘आषाढस्य प्रथम दिवसे’विषयी थोडेसे...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language